छत्रपती संभाजीनगर : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे पद आता शोभेचे बनले आहे. व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी कर्ज मंजूर करताना नाहक विचित्र अटी टाकल्या आहेत. परिणामी मराठा समाजात सरकार विरोधातला रोष निर्माण झाला आहे. ही बाब मुख्यमंत्र्यांच्याही कानावर टाकली होती. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. हे असेच सुरू राहिल्यास हे पद आपण सोडू असा इशारा अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी शुक्रवारी दिला. पाटील येथे पत्रकारांशी बोलत होते. गेल्या काही वर्षापासून लाभार्थ्यांना कर्ज मंजूर करण्यासाठी आवश्यक असणारे संमती पत्र दिले जात नाही. व्याज परताव्याची रक्कम वेळेत मिळत नाही. मिळालेल्या कर्जाच्या तुलनेत १५०० कोटी रुपये मिळणे आवश्यक होते. पण केवळ १५२ कोटी रुपये आत्तापर्यंत मिळाले आहेत. हे सारे व्यवस्थापकीय संचालकाच्या मनमानीमुळे होत आहे. त्यांच्यावर कारवाई व्हावी किंवा त्यांची बदली व्हावी यासाठीही पत्रव्यवहार केला होता. मात्र तसे होताना दिसत नाही आता मराठा समन्वयक हा प्रश्न घेऊन आंदोलन करण्याची तयारी करत आहेत असे नरेंद्र पाटील म्हणाले. सरकारची प्रतिमा खराब व्हावी म्हणून व्यवस्थापकीय संचालकांना कोणीतरी सांगितलेले असावे असा आपला संशय आहे. ते कोण याचा मात्र शोध सरकारने घ्यावा. लाभार्थ्यांमध्ये योजना मिळत नसल्याचा राग आहे. बेरोजगार तरुणांना चार चाकी वाहने घेऊन त्याचा व्यवसाय करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जात असे. आता वाहने खूप अधिक झाली आहेत म्हणून हे कर्ज देणे बंद करण्यात आले आहे. व्यवसाय कोणता निवडावा हेही व्यवस्थापकीय संचालक ठरवू लागले आहेत. या विरोधात यापूर्वीही पत्रव्यवहार केला होता. मंगळवारी मराठा समाजाच्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने उपसमितीची बैठक, तसेच मंत्रिमंडळ बैठकही होणार आहे. या बैठकीत हे दोन्ही प्रश्न पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालू, असे पाटील यांनी सांगितले. छत्रपती संभाजीनगरमधील महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालयाची अवस्था वाईट असून यातील एक जागा एका संस्थेला देण्याचा घाट महापालिका आयुक्त करत आहेत. प्रकार निंदनीय असून त्याला विरोध केला जाईल असे पाटील म्हणाले. महामंडळाच्या कामकाजाचा आढावा घेतल्याचेही त्यांनी सांगितले. विविध योजनांची आकडेवारी ही यावेळी सादर करण्यात आली. विविध बँकांनी आतापर्यंत मराठवाड्यात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मार्फत ४ हजार ९९६ कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले असून व्याज परतावा सुरू असणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या ४७ हजार २८९ एवढी आहे. आत्तापर्यंत ४५२ कोटी रुपयांचा व्याज परतावा देण्यात आलेला आहे. मात्र अटी शर्ती चा आधार घेऊन व्यवस्थापकीय संचालकाच्या कारभारावर नरेंद्र पाटील यांनी आगपाखड केली.

